श्रीशिवाजी महाराजांवर एक छोटेखानी चरित्रग्रंथ

0

 श्रीशिवाजी महाराजांवर एक छोटेखानी चरित्रग्रंथ


लोकोत्तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो कधीही पुरेसा आणि समाधानकारक असत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अशा व्यक्तीपैकी एक होते. शिवाजी महाराजांचे जीवन, त्यांनी घडविलेला इतिहास हा केवळ मराठी भाषा असलेल्या अभ्यासकांचा सृजनशील लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला नाही तर इतर भारतीय भाषांतील अभ्यासकांच्या, लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला आहे.


अशा या लोकोत्तर पुरुषाच्या जीवनाचा व त्यांनी घडविलेल्या इतिहासाचा मोजक्या पण नेमक्या शब्दांत परिचय व्हावा म्हणून श्रीशिवाजी महाराजांवर एक छोटेखानी चरित्रग्रंथ लिहून देण्याची विनंती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने डॉ. प्र. न. देशपांडे यांना केली. 


"शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली, न्यायदानात निःस्पृहता दर्शविली; गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज दिली; पश्चात्तापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले; सर्व धर्माना समान लेखले; साधुसंतांचा यथोचित आदर केला, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकरांप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱ्या महात्म्याप्रमाणे तो वंदनीय थोर पुरुष होता." डॉ. प्र. न. देशपांडे यांचे आम्ही आभारी आहोत.

रा. रं. बोराडे

अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई



१. शिवपूर्वकाल

प्रास्तविक : 

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात मराठ्यांची कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जाते. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये 'महाष्ट्र राज्याची' स्थापना केली. या स्वराज्याचा विस्तार अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये झाला. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये साम्राज्य स्थापन करताना इंग्रजांना मराठ्यांबरोबर प्रखर झुंज द्यावी लागली. कारण त्या काळात मराठे उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये अत्यंत प्रभावशाली होते. म्हणूनच केवळ महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या कामगिरीला अनन्यसाधाररण महत्त्व आहे. 


सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर मध्ययुगीन राज्यकर्त्यांप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या वंशाचे राज्य स्थापना केले नव्हते. त्यांनी स्थापन केलेल्या राज्याला 'मन्हाष्ट्र राज्य' असे नामाभिधान होते आणि महाराष्ट्रातील जनता हे राज्य म्हणजे आपले राज्य आहे असे मानत होती. खुद्द शिवाजी महाराजांची अशी भूमिका होती की हे राज्य रयतेचे असून सर्व जातीधर्माच्या लोकांना, साधुसंतांना आणि महिलांना या राज्यामध्ये सुरक्षितता आणि निर्भयता प्राप्त झाली पाहिजे. या ध्येयधोरणासाठी महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मराठ्यांची अस्मिता जागृती केली. 


'मराठा तितुका मेळवावा' हा मंत्र सांगून लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांमध्ये संघठन निर्माण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुघल आणि शाही राजवटीना निष्प्रभ करून मराठ्यांच्या राज्याचा विस्तार केला. हा सारा इतिहास लक्षात घेतल्यास छत्रपति शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासात अद्वितीय राज्यकर्ते होऊन गेले याची खात्री पटते. सतराव्या शतकात जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती स्वराज्य स्थापनेला अत्यंत प्रतिकूल होती.


राजकीय परिस्थिती


तेराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रामध्ये देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. उत्तरेमध्ये सुलतानशाही तेराव्या शतकाच्या प्रारंभी प्रस्थापित झाली असली तरी दक्षिण भारतामध्ये या शाही राजवटीचा प्रवेश झालेला नव्हता. इ. स. १२९५ मध्ये दिल्लीचा सुलतान जलालउद्दीन खिलजी याचा पुतण्या अल्लाउद्दीन याने दक्षिणेवर स्वारी केली आणि देवगिरीचा राजा रामदेवराव यादव याचा पराभव करून रामदेवरावास आपले मांडलिकत्व पत्करण्यास भाग पाडले. या अपूर्व विजयानंतर अल्लाउद्दीन उत्तरेमध्ये गेला आणि आपला चुलता जलालउद्दीन याचा खून करून त्याने दिल्लीची सत्ता बळकाविली. 


खिलजीच्या स्वारीमुळे दक्षिणेत सुलतानशाहीचा प्रवेश झाला. इ. स. १३१७ मध्ये मुबारक खिलजी याने दक्षिणेवर स्वारी करून यादवांच्या सत्तेचा शेवट केला. या घटनेबरोबरच उत्तर भारताप्रमाणे महाराष्ट्रातील सुलतानी सत्ता प्रस्थापित झाली, त्यानंतर काही वर्षातच म्हणजे इ. स. १३२४ मध्ये दिल्लीत राज्यक्रांती झाली आणि तुघलक घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली, महंमद तुघलकाच्या काळात दक्षिणेतील मधुरेपर्यंतचा भाग सुलतानशाहीच्या प्रभावाखाली आला. परंतु तुघलकांचे वर्चस्व दक्षिणेत फार काळ टिकू शकले नाही.



इ.स. १३४७ मध्ये अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनी याने दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापन केले. या बहमनी राज्यात जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारत समाविष्ट होता. एकसंधी बहमनी राज्य सुमारे दिडशे वर्षे टिकून राहीले. याकाळात दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याने (इ.स. १३३६ ते १५६५) बहामनीशी झुंज देऊन आपली संस्कृती संपन्न स्थानिक सत्ता टिकवून धरली परंतु महाराष्ट्रात मात्र बहामनीची प्रभावी सत्ता असल्यामुळे लोकजीवन मरगळून गेले होते. प्राचीन वैभव कोसळून गेले होते. चैतन्य आटून गेले होते. बहामनीची राजकीय पकड फार घट्ट असल्यामुळे स्थानिक लोकांना राजकारणामध्ये नगण्य स्थान होते. अशा परिस्थितीत इ.स. १४९० च्या सुमारास एकसंघी बहमनी राज्याला तदा गेला आणि त्याची पाच शकले झाली, पाच स्वतंत्र शाही राजवटी प्रस्थापित झाल्या. निजामशाही (अहमदनगर), आदिलशाही (विजापूर), कुतुबशाही (गोवळकोंडा), बरीदशाही (बिदर) आणि इमादशाही (वन्हाड), दक्षिणेत एकसंधी बहमनी सत्ता असताना खानदेशात मात्र फारूकी घराण्याची स्वतंत्र राजवट होती. ही राजवट इ.स. १६०१ पर्यंत म्हणजे मुगलांचा दक्षिण भारतात प्रवेश होईपर्यंत टिकून राहिली.


बहमनी राज्याचे विभाजन होऊन ज्या पाच शाही राजवटी निर्माण झाल्या त्यांचे आपापसात सतत संघर्ष चालू होते. ह्या संघर्षांत इमादशाही हे राज्य नष्ट होऊन गेले. दक्षिण भारतात शाही राजवटींचे हे संघर्ष चालू असताना उत्तर भारतामध्ये इ.स. १५२६ मध्ये सुलतानशाहीतील शेवटच्या घराण्याचा म्हणजे लोदी घराण्याचा पराभव करून बाबराने मुघल घराण्याची सत्ता दिल्लीवर प्रस्थापित केली. 


दिल्लीवर मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली

त्याच सुमारास पोर्तुगीजांनी इ.स. १५१० मध्ये गोव्यावर सत्ता प्रस्थापित केली, पोर्तुगीजांनंतर पुढे डच, इंग्रज आणि फ्रेंच यांनी शाही घराण्याकडून परवाने मिळवून भारताच्या किनारपट्टीवर ठिकठिकाणी बखारी घातल्या, आणि काही बंदरांवर घट्ट पकड निर्माण केली. अशाप्रकारे सोळाव्या शतकाच्या पुर्वार्थात मुघल व पोर्तुगीज या सत्तांचा उदय झाला आणि काही पाश्चात्य सत्ता आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागल्या.


इ. स. १५६५ मध्ये आणखी एक निर्णायक स्वरूपाची घटना घडली. दक्षिणेतील शाही राज्यकर्त्यांनी तात्पुरती एकजूट करून तालीकोटच्या लढाईत विजयनगरच्या सम्राटाचा पराभव केला आणि दक्षिणेत असलेली एकमेव प्रभावशाली स्थानिक सत्ता नष्ट केली. या घटनेनंतर शाही राजवटीतील आपापसातील संघर्ष पुन्हा उफाळून आले. दरम्यान उत्तर भारतामध्ये मुघलांनी आपला प्रभाव निर्माण केला होता आणि दक्षिण भारतामध्ये सत्ता विस्तार करण्याची आकांक्षा मुघल बाळगून होते. सम्राट अकबराने सोळाव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतामध्ये प्रवेश करून खानदेशातील फारुकी घराण्याचा शेवट केला आणि त्यानंतर मुघलांनी अहमदनगरपर्यंत मजल मारून शाही राजवटींपुढे आव्हान निर्माण केले. अकबरानंतर मुघल सम्राट शहाजहान याने इ.स. १६३६ मध्ये दक्षिणेतील स्वारी केली आणि आदिलशहा बरोबर तह करून त्याच्या मदतीने अहमदनगरची निजामशाही नष्ट केली. ही घटना मराठ्यांच्या इतिहासात महत्त्वपूर्ण मानली जाते. शिवाजी महाराजांचा उदय होण्याच्या सुमारास आदिलशाही आणि कुतूबशाही या दोन शाही राजवटी आणि दक्षिणेत नव्याने प्रभाव निर्माण करणारी मुघल सत्ता अशा तीन बलाढय राजसत्ता महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होत्या.



सामाजिक परिस्थिती


एकसंघी बहमनी साम्राज्याच्या कालखंडात (इ.स. १३४७ ते १४९०) दक्षिणेतील, विशेषतः महाराष्ट्रातील समाजजीवन तेजोहीन बनले होते. क्षात्रवृत्तीच्या मराठ्यांना बहमनी राजवटीत कोणतेही राजकीय स्थान मिळू शकले नाही. फारसी भाषा ही राजदरबारी भाषा असल्यामुळे व्यवहारामध्ये तिचा उपयोग सुरू झाला. फारसीबरोबर दख्खनी, हिंदी व उर्दू भाषेचे महत्त्व वाढले. शिक्षणव्यवस्था नसल्यामुळे सर्वसामान्य समाज निरक्षर राहिला, या समाजामध्ये अज्ञान वाढले. अंधश्रद्धा वाढल्या. बहमनी राजवटीतील लोकांच्या धर्मश्रद्धा अत्यंत चिवट होत्या. चातुर्वर्ण्य, जाती, उपजाती यांचे प्राबल्य सर्व समाजावर होते. जातीव्यवस्थेमुळे हिंदु समाज एकसंघी राहू शकला नाही. हलकी कामे करणाऱ्या जातींनी अस्पृश्य समजण्यात येऊ लागले. परिणामी हा समाज पूर्ण दरिद्री व अज्ञानी राहिला. स्पृश्य जातीकडून अस्पृश्य जातीवर अन्याय होत असे. त्यामुळे अस्पृश्यांचे जीवन अधिकच केविलवाणे झाले होते. 


जाती व्यवस्थेच्या या दुष्परिणामामुळे हिंदु धर्मियांचे संघटन होऊ शकले नाही. शस्त्र आणि शास्त्र यापासून बहुजन समाज वंचित राहिला. स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. बालविवाह, विषमविवाह, सतीची चाल, विधवांना उपेक्षित स्थान, निरक्षरता, पुरुषजातीचे वर्चस्व यामुळे स्त्रियांचे जीवन पराधीन झालेले होते. बहमनी राजवटीत महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन फारसे बदलले नाही. परंपरागत गावकीचे अधिकार पाटील-कुलकर्णी आणि देशमुख-देशपांडे यांच्याकडे अबाधीत राहिले होते. वतनदारांच्या दृष्टीने केवळ राज्यकर्ते बदलले होते, त्यांच्या अधिकारात कोणताही बदल झाला नव्हता. 


बहमनी राज्यकर्त्यांनी परंपरागत ग्रामीण जीवनात कसलाही हस्तक्षेप केला नाही. महसूल गोळा करण्याचे काम वतनदाराकडे ठेवणे त्यांना सोईचे वाटले. प्रांताचे अधिकारी आणि वरिष्ठ अंमलदार ही पदे मात्र विश्वासातील मुसलमानाकडे राहतील याची खबरदारी बहमनी राज्यकर्त्यांनी घेतली. लष्करामध्ये स्थानिक हिंदुंना कसलेही स्थान नव्हते. एवढेच नव्हे तर दक्षिणेत स्थायिक झालेल्या मुसलमानांना राजकारणामध्ये विशेष स्थान राहिले नाही. तुर्कस्थान, अरबस्थान, इराण या देशातून आलेल्या मुसलमानांना राजकारणामध्ये स्थान मिळू लागले आणि त्यातूनच पुढे परदेशी मुसलमान आणि स्थानिक मुसलमान यांच्यामध्ये संघर्ष पेटू लागला.




बहमनी राज्यकर्त्याची महाराष्ट्रातील समाज जीवनावर घट्ट पकड असतांनाही, वारकरी संप्रदायाचे भक्ती मार्गातून समाज सुधारणा घडविण्याचे आणि समाज संघटन करण्याचे कार्य अविरतपणे चालू होते. संत भानुदास, दामाजी, कान्होपात्रा, सेना न्हावी यांसारख्या संतांनी ज्ञानेश्वर नामदेवापासून चालत आलेली वारकरी संप्रदायाची वाटचाल पुढे चालू ठेवली. वारकरी संप्रदायाचे कार्य अतिशय मोलाचे असून त्यामुळे समाजजीवनात स्थैर्य कायम राहिले. एकसंघी बहमनी राजवटीत सूफी पंथाचे अनेक साधु दक्षिण भारतात स्थायिक झाले. राजाश्रयाच्या आधाराने त्यांनी आपल्या पंथाचा प्रसार केला. परंतु हा प्रसार विशेषतः शहरी भागापुरता मर्यादित राहिला. 


#ShivajiMaharaj #MarathaEmpire #IndianHistory #Maharashtra #CulturalHeritage #HistoricalFigures #Leadership #WarriorKing #Legacy #Swarajya #MaharashtraLiterature #DrPNDeshpande #Chhatrapati #MarathiPride #HistoryOfIndia #GreatLeaders #Inspiration #RespectForAll #UnityInDiversity #MaharashtraCulture #EpicTales


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)