महाराष्ट्रात मराठयांचा उदय
इ. स. १५६५ मध्ये आणखी एक निर्णायक स्वरूपाची घटना घडली. दक्षिणेतील शाही राज्यकर्त्यांनी तात्पुरती एकजूट करून तालीकोटच्या लढाईत विजयनगरच्या सम्राटाचा पराभव केला आणि दक्षिणेत असलेली एकमेव प्रभावशाली स्थानिक सत्ता नष्ट केली. या घटनेनंतर शाही राजवटीतील आपापसातील संघर्ष पुन्हा उफाळून आले. दरम्यान उत्तर भारतामध्ये मुघलांनी आपला प्रभाव निर्माण केला होता आणि दक्षिण भारतामध्ये सत्ता विस्तार करण्याची आकांक्षा मुघल बाळगून होते. सम्राट अकबराने सोळाव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतामध्ये प्रवेश करून खानदेशातील फारुकी घराण्याचा शेवट केला आणि त्यानंतर मुघलांनी अहमदनगरपर्यंत मजल मारून शाही राजवटींपुढे आव्हान निर्माण केले. अकबरानंतर मुघल सम्राट शहाजहान याने इ.स. १६३६ मध्ये दक्षिणेतील स्वारी केली आणि आदिलशहा बरोबर तह करून त्याच्या मदतीने अहमदनगरची निजामशाही नष्ट केली. ही घटना मराठ्यांच्या इतिहासात महत्त्वपूर्ण मानली जाते. शिवाजी महाराजांचा उदय होण्याच्या सुमारास आदिलशाही आणि कुतूबशाही या दोन शाही राजवटी आणि दक्षिणेत नव्याने प्रभाव निर्माण करणारी मुघल सत्ता अशा तीन बलाढय राजसत्ता महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होत्या.
सामाजिक परिस्थिती
एकसंघी बहमनी साम्राज्याच्या कालखंडात (इ.स. १३४७ ते १४९०) दक्षिणेतील, विशेषतः महाराष्ट्रातील समाजजीवन तेजोहीन बनले होते. क्षात्रवृत्तीच्या मराठ्यांना बहमनी राजवटीत कोणतेही राजकीय स्थान मिळू शकले नाही. फारसी भाषा ही राजदरबारी भाषा असल्यामुळे व्यवहारामध्ये तिचा उपयोग सुरू झाला. फारसीबरोबर दख्खनी, हिंदी व उर्दू भाषेचे महत्त्व वाढले. शिक्षणव्यवस्था नसल्यामुळे सर्वसामान्य समाज निरक्षर राहिला, या समाजामध्ये अज्ञान वाढले. अंधश्रद्धा वाढल्या. बहमनी राजवटीतील लोकांच्या धर्मश्रद्धा अत्यंत चिवट होत्या. चातुर्वर्ण्य, जाती, उपजाती यांचे प्राबल्य सर्व समाजावर होते. जातीव्यवस्थेमुळे हिंदु समाज एकसंघी राहू शकला नाही. हलकी कामे करणाऱ्या जातींनी अस्पृश्य समजण्यात येऊ लागले. परिणामी हा समाज पूर्ण दरिद्री व अज्ञानी राहिला. स्पृश्य जातीकडून अस्पृश्य जातीवर अन्याय होत असे. त्यामुळे अस्पृश्यांचे जीवन अधिकच केविलवाणे झाले होते.
जाती व्यवस्थेच्या या दुष्परिणामामुळे हिंदु धर्मियांचे संघटन होऊ शकले नाही. शस्त्र आणि शास्त्र यापासून बहुजन समाज वंचित राहिला. स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. बालविवाह, विषमविवाह, सतीची चाल, विधवांना उपेक्षित स्थान, निरक्षरता, पुरुषजातीचे वर्चस्व यामुळे स्त्रियांचे जीवन पराधीन झालेले होते. बहमनी राजवटीत महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन फारसे बदलले नाही. परंपरागत गावकीचे अधिकार पाटील-कुलकर्णी आणि देशमुख-देशपांडे यांच्याकडे अबाधीत राहिले होते. वतनदारांच्या दृष्टीने केवळ राज्यकर्ते बदलले होते, त्यांच्या अधिकारात कोणताही बदल झाला नव्हता.
बहमनी राज्यकर्त्यांनी परंपरागत ग्रामीण जीवनात कसलाही हस्तक्षेप केला नाही. महसूल गोळा करण्याचे काम वतनदाराकडे ठेवणे त्यांना सोईचे वाटले. प्रांताचे अधिकारी आणि वरिष्ठ अंमलदार ही पदे मात्र विश्वासातील मुसलमानाकडे राहतील याची खबरदारी बहमनी राज्यकर्त्यांनी घेतली. लष्करामध्ये स्थानिक हिंदुंना कसलेही स्थान नव्हते. एवढेच नव्हे तर दक्षिणेत स्थायिक झालेल्या मुसलमानांना राजकारणामध्ये विशेष स्थान राहिले नाही. तुर्कस्थान, अरबस्थान, इराण या देशातून आलेल्या मुसलमानांना राजकारणामध्ये स्थान मिळू लागले आणि त्यातूनच पुढे परदेशी मुसलमान आणि स्थानिक मुसलमान यांच्यामध्ये संघर्ष पेटू लागला.
बहमनी राज्यकर्त्याची महाराष्ट्रातील समाज जीवनावर घट्ट पकड असतांनाही, वारकरी संप्रदायाचे भक्ती मार्गातून समाज सुधारणा घडविण्याचे आणि समाज संघटन करण्याचे कार्य अविरतपणे चालू होते. संत भानुदास, दामाजी, कान्होपात्रा, सेना न्हावी यांसारख्या संतांनी ज्ञानेश्वर नामदेवापासून चालत आलेली वारकरी संप्रदायाची वाटचाल पुढे चालू ठेवली. वारकरी संप्रदायाचे कार्य अतिशय मोलाचे असून त्यामुळे समाजजीवनात स्थैर्य कायम राहिले. एकसंघी बहमनी राजवटीत सूफी पंथाचे अनेक साधु दक्षिण भारतात स्थायिक झाले. राजाश्रयाच्या आधाराने त्यांनी आपल्या पंथाचा प्रसार केला. परंतु हा प्रसार विशेषतः शहरी भागापुरता मर्यादित राहिला.
शाही राजवटीतील महाराष्ट्र
मागे सांगितल्याप्रमाणे पंधराव्या शतकाच्या अखेरीस एकसंघी बहमनी साम्राज्याची शकले होऊन ५ शाही राजवटी उदयाला आल्या त्या म्हणजे बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंडयाची कुतुबशाही, वऱ्हाडची इमादशाही आणि अहमदनगरची निजामशाही. यापैकी दोन शाही राजवटी स्थानिक मुसलमान नेत्यांनी स्थापन केल्या होत्या. उरलेल्या तीन राजवटी पैकी एक राजवट जॉर्जियामधून आलेल्या मुसलमान नेत्यांनी आणि दोन राजवटी तुर्कस्थानमधून आलेल्या मुसलमान नेत्यांनी स्थापन केल्या होत्या. शेवटच्या दोन शाही राजवटीचे संस्थापक हे मूलतः हिंदू होते. आणि स्थानिक जनतेला त्यांचेविषयी आपुलकी वाटत होती. या पाचही राजवटीत आपापसात संघर्ष करीत राहिल्या आणि अशा या संघर्षमय कालात सोळाव्या शतकाच्या अखेरीस बलाढय मुघलांनी दक्षिणेत प्रवेश केला. तेव्हा आपापसात लढणाऱ्या शाही राजवटींना आणखी एका बलाढय शत्रूशी लढा देणे क्रमप्राप्त झाले.
आपापले सामर्थ्य वाढविण्यासाठी शाही राज्यकर्त्यांनी स्थानिक हिंदुंची मदत घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच महाराष्ट्रात मराठयांचा उदय झाला. शाही राज्यकर्त्यांच्या लष्करातही मराठ्यांना स्थान प्राप्त झाले. इ.स. १६२६ मध्ये आदिलशहाने बिदरची बरीदशाही खालसा केली. त्यापूर्वीच इ. स. १५७४ मध्ये मुर्तजा निजामशाह याने वऱ्हाडची इमादशाही नष्ट करून तो प्रदेश आपल्या राज्यास जोडला होता. अशाप्रकारे सतराव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिण भारतात आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही या तीन शाही राजवटी अस्तित्वात होत्या. मुघलांशी या राजवटींचे संघर्ष चालू होते. मराठ्यांच्या उदय आणि उत्कर्ष होण्यास ही परिस्थिती कारणीभूत ठरली.
मराठ्यांचा उदय
बहमनी साम्राज्याच्या विभाजनानंतर स्थानिक हिंदुंना शाही राजवटीत काही प्रमाणात स्थान मिळू लागले याचा उल्लेख मागे केला आहेच. मात्र सोळाव्या शतकामध्ये शाही राजवटीत स्थानिक हिंदुंना मर्यादित प्रमाणात स्थान मिळालेले दिसून येते. 'बुरहाने मासीर' या समकालीन ग्रंथावरून दलपतराय, कान्हु नरसी, साबाजी इत्यादी हिंदु व्यक्तींनी शाही राजवटीत अधिकारपदे भूषविली होती असे दिसून येते. सोळाव्या शतकाच्या अखेरीस मुघलांनी दक्षिणेत प्रवेश केल्यानंतर शाही राजवटींनी आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी स्थानिक हिंदुंना लष्करात आणि मुलकी व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर स्थान देण्यास सुरुवात केली. विजापूरच्या आदिलशहाने आपल्या लष्करात खास मराठा पथक उभारले. गनिमी काव्याने लढाई करण्यास हे पथक अतिशय निष्णात होते.
आदिलशाही
प्रमाणे निजामशाहीही मराठ्यांना लष्करात प्रवेशतर मिळालाच, पण त्याचबरोबर अधिकारांच्या जागाही मिळू लागल्या. प्रामुख्याने लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांना शाही राजवटीत मुर्दुमकी गाजविण्याची संधी प्राप्त झाली. त्यातूनच मराठ्यांचा उदय होऊन काही मातब्बर मराठा घराण्यांचा उत्कर्ष झाला. आदिलशाही मध्ये चंद्रराव मोरे, झुंझारराव घाटगे, माने, घोरपडे, डफळे, सावंत, नाईक-निंबाळकर इत्यादी मराठा सरदारांचा उत्कर्ष झाला. निजामशाही मध्ये जाधवराव आणि भोसले या दोन मराठा घराण्यांचा उत्कर्ष झालेला आढळून येतो.
अहमदनगरच्या निजामशाहीत उत्कर्ष पावलेले जाधवराव हे घराणे मूळचे वऱ्हाडातील सिंदखेड या गावचे होते. देवगिरीच्या यादवांच्या वंशाशी हे घराणे संबंधीत होते असे म्हटले जाते. सोळाव्या शतकाच्या अखेरीस लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील मोठे प्रस्थ होते. त्यांची मुलगी जिजाबाई ही शहाजीची पत्नी आणि शिवाजीची आई होय.
निजामशाहीमध्ये उत्कर्षास आलेले दुसरे महत्त्वाचे घराणे म्हणजे भोसले घराणे. या घराण्याच्या संबंध शिसोदे या राजपूत वंशाशी जोडला जातो. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिसोदे घराण्यात भैरवजी उर्फ भोसाजी हा कर्तबगार पुरुष होऊन गेला. त्याच्या नावावरूनच भोसले हे आडनाव पडले असावे असा इतिहासकारांचा तर्क आहे. मात्र भोसले घराण्याची विश्वसनीय वंशावळी बाबाजी भोसले (१५४८ ते १५९९) यांच्यापासून सांगता येते. या वंशातील पुरुषांना राणा अशी पदवी होती. हे इ.स. १४७० च्या एका फर्मानावरून स्पष्ट होते. कालांतराने भोसले वंशातील पुरुष 'राणा' ऐवजी 'राजा' ही पदवी धारण करू लागले. बाबाजी भोसले हे मराठवाडयातील वेरूळ या गावचे पाटील होते. निजामशाही राजवटीत वेरूळजवळ असलेल्या दौलताबाद या किल्ल्याचे विशेष महत्त्व वाढले, बाबाजी भोसले यांनी निजामशाहीत बरीच कर्तबगारी गाजविली म्हणून शाही सुलतानाकडून नगर जिल्ह्यातील पांडे पेडगाव या गावची जहागीर बाबाजी भोसले यास मिळाली. पांडे पेडगाव हे गाव आदिलशाही व निजामशाही यांचा सरहद्दीवर असल्याने येथील जहागिरी सांभाळण्याचे काम थोडे जोखमीचे होते. ही कुवत बाबाजीजवळ असल्यामुळे निजामशहाने त्याला ही जहागिरी दिली असावी.
बाबाजी हा चार-पाच गावाचा मोकदम आणि दोन गावाचा देशमुख असल्यामुळे भोसले कुटुंबाची आर्थिक परिस्थीती निश्चितच चांगली होती. बाबाजीची दोन मुले-विठोजी आणि मालोजी हे कर्तबगार निघाले. इ.स.१५८८-८९ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या लढाईत मालोजी व विठोजी यांनी मोठा पराक्रम गाजविला. बुऱ्हाण निजामशहाने या दोन्हीही भावांना दीड दीड हजारांचा सरंजाम देऊन त्यांना बढती दिली. या सरंजामात शिवनेरी किल्ल्यासह जुन्नर परगणा मालोजी व विठोजी यांचेकडे वहिवाटीस आला. या सुमारास मालोजीचे वय केवळ चौदा-पंधरा वर्षांचे होते. इ.स. १५९१ ते १५९५ या काळात आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात जबरदस्त संघर्ष चालू होता. या संघर्षात निजामशहाच्या वतीने मालोजीने अनेक लढायांत पराक्रम गाजविला. त्याबद्दल बुऱ्हाण निजामशहाने त्याचा सरंजाम पाच हजारपर्यंत वाढविला. त्यामध्ये सुप्यासारख्या परगणा मालोजीकडे वहिवाटीस आला.
बुऱ्हाण निजामशहाच्या मृत्यूनंतर अहमदनगरच्या दरबारमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाले. मलिक अंबर आणि मिआन राजू या दोन सरदारांमध्ये सत्तास्पर्धा निर्माण झाल्या. मूर्तजा निजामशहाला मलिक अंबरचे वर्चस्व तापदायक होईल असे वाटू लागले. म्हणून त्याने मिआन राजू वर अधिक जबाबदारी टाकली आणि त्याला अधिक अधिकार दिले. त्यातून मलिक अंबर व राजू यांत अनेक चकमकी होऊ लागल्या. मालोजी भोसले हा मलिक अंबरचा पक्षपाती असून इंदापूर परगण्यातील गढीमध्ये तो वास्तव्य करुन होता. मिआन राजूच्या सैन्याने इंदापूरच्या गढीवर हल्ला केल्यानंतर झालेल्या चकमकीत मालोजी ठार मारला गेला. त्याच्या मृत्यूसमयी त्याचा मुलगा शहाजी हा केवळ पाच-सहा वर्षाचा होता. मालोजीच्या मागे विठोजीने १६११ पर्यंत जहागिरीचा सांभाळ केला. त्याच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजीकडे आली.
मालोजीच्या पत्नी निंबाळकर घराण्यातील असून तिचे नाव दीपाबाई होते. तिला शहाजी व शरीफजी अशी दोन मुले होती. त्या मुलांच्या नावासंबंधी बखरीत दिलेल्या कथांना कोणताही आधार नाही.
#ShivajiMaharaj #MarathaHistory #Maharashtra #IndianHistory #BattleOfTalikota #MughalEmpire #Akbar #ShahJahan #AdilShahi #NizamShahi #BahmaniSultanate #CasteSystem #SocialIssues #HistoricalFigures #MarathaEmpire #CulturalHeritage #IndianDynasties #HistoricalEvents #UnityInDiversity #LegacyOfShivaji