शहाजीचा उत्कर्ष । भातवडीची लढाई । स्वतंत्र वृत्तीचा शहाजी

0

शहाजीची कामगिरी


ज्यावेळी जहागिरीची जबाबदारी आली त्यावेळी शहाजी केवळ १२ वर्षांचा होता. आपल्या कर्तबगारीवर शहाजीने मलिक अंबरचा विश्वास संपादन केला आणि काही वर्षांतच तो मातब्बर सरदार झाला. त्याचे वडील मालोजी व चुलते विठोजी हे दोघेही पराक्रमी होते. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा मालोजीने जिर्णोध्दार केला तसेच शिखर शिंगणापूर येथे यात्रेकरूंच्या सोईसाठी एक तलाव बांधला. औरंगाबाद मध्ये मालपूरा आणि विठपुरा अशा दोन पेठा आहेत. ही नावे मालोजी विठोजी यांच्यावरून पडली असावीत असे मानले जाते. श्रीगोंदयाच्या शेख महंमद या संतास मालोजीने बारा बिघे बागायती जमीन दान म्हणून दिली होती. श्रीगोंदयास जी पेठ मालोजीने बसविली तिला मकरंदपुरा असे म्हणतात. मालोजीस मकरंद अशी पदवी मिळाली होती हे ऐतिहासिक पुराव्यावरुन स्पष्ट होते.




शहाजीचा उत्कर्ष

विठोजी भोसल्याच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजीवर आली. मालोजीची पंचहजारी शहाजीला मिळाली. लहान वयातही ही जबाबदारी शिरी घेण्याची कुवत शहाजीमध्ये होती. शहाजीची ही कुवत पाहून निजामशाहीतील सप्तहजारी सरदार लखुजी जाधवराव याने आपली कन्या जिजाबाई हिचा विवाह शहाजीबरोबर केला. या संदर्भात बखरीत दिलेली रंगपंचमीच्या सणाची कथा निराधार असून शहाजीच्या विवाहाप्रसंगी मालोजी हयात नव्हता हे लक्षात घेतले पाहिजे. शहाजीचे दुसरे लग्न मोहिते घराण्यातील तुकाबाईशी झाले. इ.स.१६२० पासून शहाजीच्या कर्तबगारीला बहर आलेला दिसून येतो.


मलिक अंबरचे कर्तृत्व


बुऱ्हाण निजामशहाच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली. त्यावेळी चांदबिबीने पराक्रम गाजवून अहमदनगरचा बचाव केला, तरीपण तिच्या मृत्यूनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून १९ ऑगस्ट १६०० रोजी अहमदनगर जिंकून घेतले. राजधानीचे शहर अहमदनगर हातचे गेल्यानंतरही मलिक अंबरने धीर सोडला नाही. मूर्तजा निजामशहा दुसरा याला मराठवाड्यातील परिंड्याच्या किल्ल्यात सुरक्षित ठेऊन दौलताबादजवळ असलेल्या खडकी या गावी मलिक अंबरने आपली नवी राजधानी उभारली. हे खडकी गाव पुढे औरंगाबाद या नावाने प्रसिद्धीस आले. निजामशाही वाचविण्याचे प्रयत्न चालू असतांना मलिक अंबरला शहाजीचे मोठे सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी असलेल्या मिआन राजूने मलिक अंबरला सर्वतोपरी सहाय्य केले.


अकबरानंतर मुघल सम्राट बनलेल्या जहांगीरने निजामशाहीचा उच्छेद करण्यासाठी शहानवाजखान नावाच्या सरदारास दक्षिणेत पाठविले. शहानवाजखानाने रोशन गावला मलिक अंबरचा पराभव करून फेब्रुवारी १६१६ मध्ये खडकी हे गाव लुटले. मलिक अंबरने मुघलाशी तह करून बालाघाटचा प्रदेश जहांगीरला दिला. अशाप्रकारे एक मोठा पराभव मलिक अंबरला पत्करावा लागला. या प्रतिकूल परिस्थितीत लखुजी जाधवरावाने निजामशाही सोडली आणि तोही मुघलांना जाऊन मिळाला. अशा या आणीबाणीच्या काळामध्ये मलिक अंबरला शहाजीचे मोठे सहकार्य मिळाले.


भातवडीची लढाई


अकबरानंतर जहागीर मुघल सम्राट झाल्यावर त्याने दक्षिण भारतात राज्यविस्तार करण्याचे प्रयत्न सुरू केले. लखुजी जाधवराव मुघलांना मिळाल्यामुळे निजामशाहीची बाजू लंगडी पडली होती. या परिस्थितीची फायदा घेऊन विजापूरच्या आदिलशहाला जहांगीरने निजामाविरूद्ध चिथावले. त्यामुळे मलिक अंबर अडचणीत येईल असा जहांगीरचा कयास होता. परंतु धूर्त मलिक अंबरने गोवळकोंड्याच्या कुतुबशहाबरोबर तह करून आपली बाजू भक्कम केली. त्यानंतर थेट बीदरपर्यंत चढाई करून आदिलशाही फौजेचा मोठा पराभव केला. त्यानंतर मलिक अंबरने थेट विजापूरपर्यंत मोहिम काढून आदिलशहाच्या राजधानीलाच वेढा दिला. परंतु मुघलांची मदत मिळाल्यामुळे आदिलशहाने निकराचा लढा दिला. तेव्हा नाईलाज होऊन मलिक अंबरने विजापूरचा वेढा उठविला आणि अहमदनगरकडे त्याने प्रयाण केले. या संधीचा फायदा घेऊन आदिलशहा व मुघल यांच्या फौजांनी मलिक अंबरला भातवडीजवळ गाठले.


ऑक्टोबर १६२४ मध्ये मोठा रणसंग्राम होऊन मलिक अंबरने आदिलशाही व मुघली फौजांना पराभव केला. या लढाईत मलिक अंबरप्रमाणे शहाजीनेही मोठा पराक्रम गाजविला. शहाजीचा भाऊ शरीफजी यानेही या लढाईत मोठा पराक्रम गाजविला. या लढाईत त्याला वीरमरण आले. भातवडीच्या लढाईत मुघल आणि आदिलशहा या दोघांनाही माघार घ्यावी लागली.


भातवडीच्या अपूर्व यशानंतर निजामशाहीला उर्जितावस्था येण्यास काहीच हरकत नव्हती. परंतु मलिक अंबर व शहाजी यांच्यामध्ये अचानक बेबनाव निर्माण झाला. परिणामी शहाजीने निजामशाही सोडून आदिलशाहीचा आश्रय घेतला. त्यामुळे मलिक अंबर व शहाजी यांच्यात प्रत्यक्ष संघर्षास सुरुवात झाली. तथापि या संघर्षात मलिक अंबरला यश मिळू शकले नाही. त्यामुळे विजापूरच्या दरबारात शहाजीचे वर्चस्व वाढले. शहाजीमुळे अनेक मातब्बर मराठ्यांना आदिलशाहीच्या दरबारात मानाच्या जागा मिळाल्या.


स्वतंत्र वृत्तीचा शहाजी


१६२७ मध्ये दक्षिणेतील आणि उत्तरेतील राजकारणात दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. १४ मे १६२७ रोजी मलिक अंबरचा मृत्यू झाला व त्यामुळे निजामशाहीची जबरदस्त हानी झाली. त्याचप्रमाणे २८ ऑक्टोबर १६२७ रोजी मुघल सम्राट जहांगीर मृत्यू पावल्यामुळे दिल्लीच्या सिंहासनावर शहाजहान विराजमान झाला. या दोन घटनांचा उत्तरेतील व दक्षिणेत्तील राजकारणावर दूरगामी परिणाम झाला.


शहाजी जरी आदिलशाहीमध्ये मानाचे स्थान मिळवून होता, तरीपण अंतर्यामी निजामशाहीची त्याला ओढ होती. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशाही पोरकी झालेली पाहून शहाजीचे मन निजामशाहीकडे ओढ घेऊ लागले. अशा परिस्थितीत १२ सप्टेंबर १६२७ रोजी इब्राहिम आदिलशहा मृत्यू पावला. त्याच्या जागी आलेल्या मुहमदशहाशी शहाजीचे जमले नाही. त्यामुळे स्वतंत्र वृत्तीच्या शहाजीने १६२८ च्या पावसाळ्यापूर्वी आदिलशाही सोडली आणि निजामशाहीत प्रवेश केला. या सुमारास मुघलांची चाकरी सोडून लखुजी जाधवराव हाही निजामशाहीत दाखल झाला. वास्तविक पहाता लखुजी जाधवराव व शहाजी भोसले हे दोन बलाढ्य सरदार निजामशाहीस मिळाल्यामुळे या राजवटीचा उत्कर्ष होण्याची मोठी संधी प्राप्त झाली होती. परंतु प्रत्यक्ष निजामशाही मध्ये अंतर्गत कटकरी, हेवेदावे इतके वाढले होते की शाही दरबारात संशयाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्ष निजामशहाला लखुजी जाधवरावांविषयी संशय व तिरस्कार वाटू लागला. त्यातूनच २५ जुलै १६२९ रोजी लखुजी जाधवराव, त्याची २ मुले अचलोजी व रघोजी आणि नातू बसवंत यांच्यावर निजामशहाने मारेकरी घातले आणि भर दरबारात हत्याकांड घडून आले. हा भीषण प्रकार पाहिल्यानंतर शहाजीला निजामशाहीचा वीट आला आणि त्याने निजामशाही सोडून मुघलांकडे जाण्याचे ठरविले. शहाजीचा मनोदय ओळखून बादशहा शहाजहानने शहाजीस पंचहजारी देऊ केली. त्याचा मुलगा संभाजी यालाही दोन हजारी व चुलतभाऊ मालोजी याला दोन हजारी असा सरंजाम देण्याचे मान्य केले अशाप्रकारे शहाजी फिरून मुघलांकडे आला. मुघलांकडे आल्यावर बंडखोर पठाण सरदार दर्याखान याचे पारिपत्य करण्याची जबाबदारी शहाजीवर शहाजहानने सोपविली. या सुमारास शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाबाई प्रसूत होऊन शिवाजीचा जन्म झाला. मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत शहाजीला शिवनेरीवर जाण्याची सवड मिळाली नाही. पावसाळा सुरू झाल्यावर शहाजी शिवनेरीला गेला आणि पुत्रमुख त्याने पाहिले.



इ. स. १६३० मध्ये महाराष्ट्रात विशेषतः बालाघाट प्रदेशात भीषण स्वरूपाचा दुष्काळ पडला. समकालीन साहित्यामधून या भीषण दुष्काळाची वर्णन आढळतात. 'बादशहानामा' या ग्रंथात या भीषण दुष्काळाचे तपशीलाने वर्णन आलेले आहे. शहाजी मुघलांकडे गेल्यानंतर निजामशाही जवळजवळ मोडकळीस आली. मलिक अंबरचा मुलगा फत्तेखान याने निजामशाही सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. उलट कटकारस्थानांना कंटाळून ऑक्टोबर १६३१ मध्ये फत्तेखानाने निजामशहाला ठार मारले. त्यामुळे निजामशाहीची अवस्था मोठी दयनीय झाली. आता निजामशाही मुघलांच्या आहारी जाणार हे शहाजीच्या लक्षात आले आणि म्हणून कोकणात असलेला निजामशहाचा एक वारस शोधून काढून शहाजीने त्याची प्रतिष्ठापना जुन्नर येथे केली. निजामशाही वाचविण्याचे त्याने प्रयत्न सुरू केले. शहाजीच्या या हालचाली मुघलांना धोकादायक वाटल्या. तरीपण आपण मुघलांशी एकनिष्ठ आहोत असे शहाजी वरकरणी भासवत होता.



शेवटचा लढा


दौलताबाद मुघलांच्या ताब्यात गेल्यावर जुन्नरच्या गडावर बंदोबस्तात ठेवलेल्या निजामशाहीच्या वारसास शहाजीने नगर जिल्ह्यातील पेमगड या ठिकाणी ठेवले. आदिलशहाकडून मुरारपंत आणि मातब्बर सरदार रणदुल्लाखान शहाजीच्या मदतीसाठी आले. आदिलशहा व शहाजी एकत्र आलेले पाहून शहाजहानला चिंता वाटू लागली. या सुमारास आदिलशाहीच्या दरबारातच सुंदोपसुंदी सुरू झाली. खवासखान आणि मुस्तफाखान या दोन सरदारांमध्ये संघर्ष सुरू झाला. त्यात खवासखानने आपल्या रक्षणासाठी उत्तरेतून शहाजहान बादशहाला बोलविले. जानेवारी १६३६ मध्ये शहाजहान नर्मदा ओलांडून दक्षिणेमध्ये आला. निजामशाही नष्ट करण्याचा त्याचा अंतस्थ हेतू होता. दक्षिणेत येताच त्याने कुतूबशहास सामोपचाराने आपल्याकडे वळविले. आदिलशहाच्या वतीने रणदुल्लाखानाने मुघलांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा पराभव झाला. अशाप्रकारे कुतूबशहा व आदिलशहा यांना नामोहरम करून शहाजहानने आपला मोहरा शहाजीकडे वळविला. ६ मे १६३६ रोजी शहाजहान व आदिलशहा यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण तह झाला. हा तह दक्षिणेतील राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. या तहातील २ कलमे महत्त्वाची असून एका कलमाप्रमाणे आदिलशहा हा शहाजहानचा मांडलीक झाला. दुसऱ्या कलमाप्रमाणे निजामशाही खालसा करून ते राज्य मुघल आणि आदिलशहा यांनी वाटून घ्यावे असे ठरले.


या तहामुळे शहाजीला आदिलशहाचा असलेला आधार तुटला. निजामशाही वाचविण्यासाठी आता दोन बलाढ्य शत्रूशी आपल्याला सामना द्यावा लागेल याची शहाजीला जाणीव झाली. ज्या रणदुल्लाखानाने शहाजीला मदत केली त्यालाच आदिलशहाने शहाजीविरूद्ध पाठविले. शहाजहानने खान झमान यास शहाजीविरूद्ध चालून जाण्यास सांगितले. अशा बिकट परिस्थितीतही निकराची झुंज देण्याचा प्रयत्न शहाजीने सुरू केला. गनिमीकाव्याने लढण्यासाठी त्याने डोंगराळ प्रदेशाची निवड केली. प्रथम त्याने सिंहगड व राजगड या किल्ल्यांचा आश्रय घेतला. रणदुल्लाखान आणि खान झमान पाठलागावर होतेच. तेव्हा शहाजीने कोकणात उतरून माहुली किल्ल्याचा आश्रय घेतला. मुघलांनी माहुलीच्या किल्ल्याला वेढा दिला. शहाजीने शर्थीची झुंज सुरू केली. परंतु निजामशाहीच्या वारसाच्या मूर्तजाच्या आईने शहाजहानशी तहाची बोलणी लावल्यामुळे अखेर शहाजीला शरण जाणे भाग पडले. ऑक्टोबर १६३६ मध्ये शहाजहानने माहुलीचा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला आणि आदिलशहाची चाकरी पत्करून तो कर्नाटकाकडे निघून गेला. या घटनेबरोबर निजामशाहीचाही अंत झाला.



शहाजीचे कार्य


कर्नाटकाकडे जाण्यापूर्वी शहाजीने आपल्या पुणे जहागिरीची व्यवस्था लावली. दादाजी कोंडदेव यास कारभारी नेमले. जिजाबाई व बालशिवाजी यांना पुणे जहागिरीतच ठेवले. आदिलशहाने कर्नाटकातील छोट्या मोठ्या हिंदू राजवटींवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची कामगिरी शहाजीवर सोपविली होती. शहाजीने या लहान मोठ्या राजवटींवर आपले वर्चस्व निर्माण केले, त्यांच्याकडून खंडण्या वसुल केल्या. परंतु एकही राज्य खालसा केले नाही त्यामुळे महंमद आदिलशहास शहाजीचा वारंवार संशय येत होता. शिवभारतकाराने असे म्हटले आहे की, 'कर्नाटकातील हे छोटे मोठे राजे माझ्या ऐवजी शहाजीलाच मोठे मानतात अशी खंत आदिलशहाला वाटत होती.'


शिवाजीने स्वराज्य कार्य सुरू केल्यावर त्याला प्रतिबंध करण्यासाठी आदिलशहाने जुलै १६४८ मध्ये शहाजीला कैद केले. शिवाजीकडून सिंहगडचा किल्ला परत मिळाल्यावर शहाजीची सुटका करण्यात आली. यावेळी त्याने आपल्याबरोबर असलेल्या कान्होजी जेधे या देशमुखास शिवाजीच्या सहकार्यासाठी जावे असे सांगितले. सुटका झाल्यानंतर शहाजी पुन्हा कर्नाटकात येऊन आदिलशहाच्या वतीने कारभार पाहू लागला. जरी आदिलशहाला शहाजीचा वारंवार संशय येत असला तरी तो शहाजीला वचकून होता. शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराचे प्रयत्न चालू असतांना शहाजीची त्याला आतून मदत होत होती का? असा एक प्रश्न इतिहासात निर्माण होतो. जरी शिवाजीला प्रत्यक्ष मदत शहाजीने केल्याचा स्पष्ट पुरावा मिळत नसला तरी शिवाजीच्या कार्यात त्याने कधीही अडथळे आणले नाहीत ही गोष्ट लक्षणीय मानली पाहिजे. इ. स. १६६१ मध्ये दक्षिणेतील हिंदू नायकांना एकत्रित करून उठाव करण्याचा प्रयत्न शहाजीने केला असावा हे डच कागदपत्रांवरून सिद्ध होते. या कटाच्या संशयावरून आदिलशहाने शहाजीस पुन्हा कैद केले होते. पण जुलै १६६३ मध्ये त्याची परत सुटका केली. त्यानंतर केवळ ५-६ महिन्यातच कर्नाटकातील होद्देगिरी याठिकाणी शिकारीला जात असतांना घोड्यावरून पडून २३ जानेवारी १६६४ रोजी शहाजीचा मृत्यू झाला.


शहाजीच्या कार्याचे मूल्यमापन अनेक इतिहासकारांनी केले आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी तर स्वराज्य स्थापनेची मूळ कल्पना व योजना शहाजीचीच होती असा निष्कर्ष काढला. बहुतेक इतिहासकार शहाजीचे कार्य शिवाजीला पुरक ठरले असा निष्कर्ष काढतात. राजवाडे म्हणतात, "शिवाजीचा पूर्वावतार जो शहाजी त्याच्या कर्तबगारीवर शहाजीचा पश्चादवतार जो शिवाजी त्याने आपल्या कर्तबगारीची इमारत उठविली." (राधा माधव विलास चंपू, पृष्ठ ३६.)


शहाजीच्या चरित्राचे साक्षेपी अवलोकन केल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे शहाजी हा स्वतंत्र बाण्याचा आणि स्वाभिमानी वृत्तीचा पुरुष होता. इतिहासाचार्य राजवाडे लिहितात, 'मूळ धन्याचे मांडलिकत्व पत्करिता पत्करिता ते प्रसंगी झुगारून स्वराज्य स्थापण्याचा प्रकारही असाच स्वामिद्रोहाच्या आरोपास पात्र होता. कर्नाटकांतील स्वराज्य स्थापनेतील हे गौणत्व शहाजी जाणून होता. करतां, मिधेपणाचा गंध हि ज्या स्थापनेत आढळून येणार नाही, असे स्वराज्य दादाजी कोंडदेव, जिजाबाई व शिवाजी यांच्या द्वारा शहाजीने चौथ्यानदा स्थापिण्याचा उद्योग बंगळूराहून पुणे प्रांती करविला. निजामशाही टिकविण्यासाठी शहाजहानविरूद्ध त्याने जो लढा दिला त्यावरून त्याच्या स्वतंत्र आणि स्वाभिमानी वृत्तीची कल्पना येते. त्याने जे डावपेच खेळून मुघलांविरूद्ध लढा दिला ते डावपेच शिवाजीला स्वराज्यकार्यात मार्गदर्शक ठरले यात काही शंका नाही.'


#ShivajiMaharaj #MarathaHistory #MalikAmbar #Shahaji #MaharashtraHeritage #HistoricalFigures #WarriorsOfIndia #NizamShahi #MarathaEmpire #LegacyOfShivaji #IndianHistory #CourageAndValor #MaharashtraCulture #ShivajiLegacy #HistoricalEvents #MarathaWarriors #ShivajiInspiration #MaharashtraPride #CulturalHeritage #ShivajiAndShahaji

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)