बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे महामेळावा...
बेळगाव—belgavkar—belgaum : कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी होणार आहे. याचदिवशी मराठी भाषिकांचा भव्य महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषिकांच्या न्याय हक्कासाठी सोमवार दि. ९ रोजी सकाळी ११ वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली महामेळावा यशस्वी करणारच असा निर्धार मराठी भाषिकांनी केला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महामेळावा आयोजित करण्यात येत असून मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. यावर्षीही महामेळावा आयोजित केला जाणार आहे. यासंदर्भात बेळगावचे जिल्हाधिकारी, तसेच पोलीस आयुक्तांना रितसर परवानगी पत्र पाठविण्यात आले आहे.
केवळ बेळगाववर हक्क दाखविण्यासाठी अधिवेशन भरविले जात असल्याने मराठी भाषिकांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. आजवर महामेळाव्याला महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहिले आहेत. महामेळावा होऊ नये यासाठी वेळोवेळी आडकाठी घालण्याची भूमिका कर्नाटक सरकारने केली आहे. परंतु यावर्षी कोणत्याही परिस्थितीत बेळगावमध्ये महामेळावा आयोजित करणारच अशी कणखर भूमिका समितीची सुरुवातीपासूनच होती.
महामेळावा करु नये, यामुळे शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडते, अशी विनंती पोलीस आयुक्तांनी केली होती. परंतु महामेळावा हा मराठी भाषिकांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने तो होणारच, अशी भूमिका मध्यवर्ती म. ए. समितीने घेतली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून महामेळाव्याला प्रारंभ होईल. यावेळी मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
#Belgaum #MarathiLanguage #Maharashtra #SamajikSamanvay #MarathiPride #DharmveerSambhaji #MaharashtraUnity #BelgaumRally #MarathiCommunity #KarnatakaAssembly #MarathiRights #CulturalHeritage #MarathiEvent #BelgaumMahamelava #MarathiIdentity #UnityInDiversity #MarathiVoice #BelgaumProtest #MarathiSolidarity #CivicEngagement