बेळगाव तालुका : या गावामध्ये वाघाची चर्चा...
बेळगाव—belgavkar—belgaum : बडस-मोरब दरम्यानच्या रस्त्यावर वाघसदृश प्राण्याचे बसमधील प्रवाशांना तसेच काही जणांना शुक्रवारी सायंकाळी दोनवेळा दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने परिसराला भेट देऊन शहानिशा करावी, अशी मागणी केली जात आहे.
शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या दरम्यान बेळगावकडून बाकनूरकडे परिवहन खात्याची बस जात होती. त्यावेळी बडस गावच्या हद्दीतील पुलावरून झाडा-झुडपात जाणारा वाघसदृश प्राणी बसचालक आणि काही प्रवाशांच्या निदर्शनास आला. ही बातमी दोन्ही गावांमध्ये पसरताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर बडस येथील नारायण पाटील यांनी देखील वाघसदृश प्राण्याचे दर्शन झाल्याचा दावा केला.
एकाच दिवशी दोनवेळा वाघसदृश प्राणी नजरेस पडल्याने खळबळ उडाली असून सर्वत्र याची चर्चा सुरू आहे. यापूर्वी तालुक्यात बिबट्याचे दर्शन झाले होते. मात्र, यावेळी लोकांनी प्रथमच वाघसदृश प्राण्याचे दर्शन झाल्याचा दावा केल्याने चर्चेला उधान आले आहे. परिणामी लोकांमध्ये भीती निर्माण झाली असून तातडीने वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शहानिशा करावी, जेणेकरून लोकांच्या मनातील भीती दूर होईल, अशी मागणी केली जात आहे.
#Belgaum #BelgaumTaluka #WildlifeSightings #TigerSighting #FearInTheVillage #ForestDepartment #LocalNews #WildlifeConservation #NatureLovers #AnimalEncounters #CommunitySafety #WildlifeAwareness #BelgaumDiaries #NaturePhotography #TigerFear #LocalResidents #WildlifeProtection #SafetyFirst #BelgaumUpdates #WildlifeCrisis