बेळगाव : ठिकाण ऐनवेळी जाहीर करणार #महामेळावा #समिती
9 जानेवारी रोजी बेळगावातच महामेळावा
बेळगाव—belgavkar—belgaum : कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाविरोधात बेळगावातच महामेळावा घेण्यात येईल, पण यावेळी गनिमी काव्याने हा महामेळावा घेण्यात येणार असून महामेळाव्याचे ठिकाण ऐनवेळी जाहीर करण्यात येईल. त्यामुळे लोकांनी अटक झाली तरी चालेल, पण सरकारी दडपशाहीविरोधात महामेळाव्यात सहभागी व्हा, असे आवाहन शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संयुक्त बैठकीत करण्यात आले.
मराठा मंदिर सभागृहात माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली महामेळाव्यासंदर्भात शहर आणि तालुका म. ए. समितीची बैठक झाली. बैठकीत अनेकांनी विचार व्यक्त करून 9 जानेवारी रोजी बेळगावातच महामेळावा घेण्यात यावा, अशी विनंती केली. तर महामेळाव्यासाठी समितीने प्रशासनाकडे 5 ठिकाणे सुचविली आहेत. त्यामुळे लोकांत संभ्रम होईल, अशी शंका व्यक्त केली. त्यावर अध्यक्ष किणेकर यांनी, गेल्या दोन वर्षांपासून कर्नाटक सरकार महामेळावा होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहे. शिनोळीत जाऊन आंदोलन करा, असे सांगत आहेत. पण, आमच्यावर केंद्र सरकारने अन्याय केला आहे. सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असताना कर्नाटक सरकार बेकायदा विधिमंडळ अधिवेशन बेळगावात घेत आहे. त्याविरोधात आम्ही बेळगावात आंदोलन करून विरोध करणार आहोत, असे पोलिसांना सांगितले आहे.
आम्ही ज्याठिकाणी आंदोलन करणार ती जागा पोलिसांकडून बंद करण्यात येते. त्यामुळे आम्ही यंदा महामेळावा कुठे होणार हे ऐनवेळी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. गनिमीकाव्याने आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने आम्हाला परवानगी दिली नाही तरी आमचा महामेळावा होणारच. त्यासाठी अटक झाली तरी आम्ही माघारी फिरणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपला विरोध दाखवण्यासाठी महामेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन किणेकर यांनी केले.
प्रकाश मरगाळे यांनी, संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी त्याग करण्याची तयारी ठेवावी लागते. आमच्याविरोधात सरकारी यंत्रणा आहे. त्यामुळे आम्ही केवळ पदाचा विचार न करता सरकारच्या बेकायदा कृतीला विरोध कसा करता येईल, याचा विचार करावा, असे ते म्हणाले. यावेळी अनिल आमरोळे यांनी, महामेळाव्यासाठी मध्यवर्ती समितीच्या प्रत्येक सदस्याने २५ सदस्य आणावेत, असे आवाहन केले.
अॅड. अमर यळ्ळूकर, मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, रामचंद्र मोदगेकर, बी. डी. मोहनगेकर, अनिल पाटील, रणजीत हावळाण्णाचे, मदन बामणे, बी. एस. पाटील, श्रीकांत मांडेकर, मोतेस बारदेसकर आदींनी मनोगत व्यक्त केले. बी. ओ. येतोजी, अॅड. एम. जी. पाटील, रमाकांत कोंडुकसकर, आर. के. पाटील, युवा आघाडी अध्यक्ष राजू किणयेकर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, नारायण सांगावकर, प्रविण रेडेकर, जोतिबा आंबोळकर, बाबू कोले यांच्यासह इतर उपस्थित होते.
#Belgaum #MaharashtraEkikaranSamiti #KarnatakaAssembly #Protest #MassGathering #BelgaumProtest #GovernmentOppression #Unity #Resistance #SocialJustice #PoliticalActivism #BelgaumEvent #January9 #PeoplePower #StandTogether #CivilRights #Demonstration #CommunitySupport #CollectiveAction #FightForRights #BelgaumMovement