बेळगाव : यंदा हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी असेल
बेळगाव-belgavkar : बेळगाव येथील सुवर्ण विधासौधमध्ये ९ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविण्यात येणार आहे. याआधी ९ ते २० डिसेंबर या कालावधीत अधिवेशन होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, यंदा हिवाळी अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने कमी करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी अधिवेशन ९ ते १९ डिसेंबरपर्यंत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
यामुळे यंदा अधिवेशनाचा कालावधी १० ऐवजी ९ दिवस होईल. गुरुवारी मंगळूर येथील सरकारी विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी ही माहिती दिली आहे. दरवर्षी बेळगावात १० दिवसीय हिवाळी अधिवेशनाचे आयोजन करण्यात येत असते. याप्रमाणे यंदाही ९ ते २० डिसेंबर या कालावधीत दहा दिवसीय विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविण्याचा निर्णय घेण्यात आलाहोता. अधिवेशनाच्या दृष्टीने बेळगाव शहरासह हलगा-बस्तवाड येथील सुवर्ण विधानसौधमध्ये आवश्यक पूर्वतयारी सुरू झाली आहे.
दरम्यान, मंड्या येथे अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलन असल्याने अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने कमी करून १९ डिसेंबर रोजी अधिवेशनाची सांगता करण्यात येणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अधिवेशन पुढे सुरू ठेवावे का, याबाबत ९ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कायदामंत्री, विरोधी पक्षांच्या नेत्यांची संयुक्त बैठक बोलावून निर्णय घेणार असल्याचे खादर यांनी यावेळी सांगितले.
बेळगावातील हिवाळी अधिवेशनात राज्यातील विकासासंदर्भात त्यातही विशेषतः उत्तर कर्नाटकातील विकासाबाबत चर्चा करण्यास प्राधान्य देण्यात यावे, याभागातील ज्वलंत प्रश्न आणि समस्यांबाबत अधिवेशनात चर्चा व्हावी, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रमुख समस्या सोडविण्यासह या भागातील शेतकरी, कामगार, नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, यादृष्टीने सभागृहात चर्चा व्हावी, यासाठी सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहात चर्चेला प्राधान्य द्यावे, अशी आपली इच्छा असल्याचे खादर यांनी यावेळी सांगितले.
#Belgaum #WinterSession #KarnatakaAssembly #LegislativeAssembly #PoliticalDiscussion #DevelopmentIssues #FarmersRights #LaborRights #PublicFacilities #LegislativePreparation #SessionDuration #GovernmentDecisions #KannadaLiterature #BelgaumNews #AssemblySpeaker #StateGovernment #Mangaluru #LegislativeProcess #NorthKarnataka #CommunityConcerns